Tuesday 8 May 2018

मखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते.

मराठीतील तलत..अरुण दाते!



- मनोज कुलकर्णी



"संधीकाली या अशा.."

मखमली आवाजाचे लोकप्रिय गायक अरुण दाते गेल्यावर दिवसभर चालू असलेल्या माझ्या (संगणकावरील) 'सिनेमा पुराण' लिखाणातून संध्याकाळी जरा विराम घेत, चहा घेऊन बाहेर आलो..तर झाडांतील आल्हाददायक झुळूक सुखावताना त्यांचे "..प्रणयगीत हे असे कानी ऐकू येतसे.." रूमानी करून गेले!

रफींच्या गाण्यातच अधिक रमणारा मी तलतच्या अभिजात (उर्दू-हिंदी) फ़िल्मी ग़ज़लनी कधी हेलावून जात असे! मात्र मराठी भावगीत प्रकार मी फार कमी म्हणजे... पं. हृदयनाथांच्या त्यांनी वा लता मंगेशकरांनी गायलेल्या त्यांच्या रचनांपुरता कधी तरी ऐकायचो!..पण जेंव्हा अरुण दाते यांनी गायलेले "शुक्र तारा मंद वारा.." कानावर पडले, तेंव्हा मराठी भावगीतही "..आज तू डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा.." असे उत्कट रूमानी असू शकते याचा प्रत्यय मला आला..आणि त्यांची गाणी समरसून ऐकू लागलो!
अरुण दाते तन्मयतेने गाताना..!

इंदूर चे असलेल्या अरुण दाते यांच्यावर स्वाभाविकपणे हिंदी भाषेचा प्रभाव होता..आणि त्यांनी गायनास सुरुवातही हिंदी-उर्दू ग़ज़लने केली होती.."कुछ दिन से बेरुख़ी का अजब सिलसिला हैं.." १९५५ मध्ये आकाशवाणीवर गायला सुरवात केल्यानंतर, त्यांना संगीतकार श्रीनिवास खळे यांनी मंगेश पाडगांवकर यांचे "शुक्र तारा.." हे मराठी गीत गाण्याची गळ घातली! तेंव्हा सुरुवातीस सुधा मल्होत्रा यांच्या बरोबर त्यांनी ते गायले (पुढे अनुराधा पौडवालने साथ दिली)..त्याचा लहेजा हा काहीसा हिंदी ग़ज़ल सदृशच होता!..१९६२ च्या सुमारास त्यांची ती ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाली!

अरुण दाते यांनी अनुराधा पौडवाल बरोबर सादर केलेला 'शुक्र तारा'!
'आकाश गंगा' (१९९४) तील "येशील येशील राणी.." अशी थोडीच गाणी त्यांनी चित्रपटासाठी गायली..अर्थात मराठी चित्रपटाचा एकूण बाज हा त्यांच्या मृदु आवाजास मानवणारा नव्हता! मात्र तलत मेहमूद ने "यश हे अमृत झाले.." हे त्यास साजेसे गाणे 'पुत्र व्हावा ऐसा' (१९६१) या अभिजात मराठी चित्रपटात अभिनेता विवेक साठी गायले होते..तशी गाणी वा तरल प्रेमगीतेही मूळ मराठी असलेल्या अरुण दातेंना मिळाली असती तर बहार आली असती!

त्यांनी आपल्या स्वतंत्र बैठकीच्या गायन कार्यक्रमांतूनच तशा श्रोतृवर्गास रिज़वले..आणि २०१० पर्यंत 'शुक्र तारा' चे हजारो कार्यक्रम केले! भावगीत गायनातील दिग्गज गजाननराव वाटवे यांच्या नावाचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला!

मी शीर्षकात 'मराठीतील तलत' असे त्यांस संबोधले आहे ते वावगे ठरू नये; कारण त्या दोघांचाही स्वर मृदु नि मुलायम होता आणि गायन शैली ही..हृदयास स्पर्श करणारी!

त्यांस माझी सुमनांजली!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment