Thursday 3 May 2018

आद्य चित्रकर्ते भालजी पेंढारकर.

'बाबा' भालजी पेंढारकरांना वंदन!


- मनोज कुलकर्णी



आपल्या भारतीय चित्रपटाच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक आणि मराठी चित्रपटसृष्टी तील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे.. 
चित्रकर्ते भालजी पेंढारकर ज्यांस आदराने "बाबा" म्हंटले जाई! त्यांची आज १२१ वी  जयंती!
भालजी पेंढारकरांच्या 'श्यामसुंदर' (१९३२) ची जाहिरात!

'कलापूर' संबोधले जाणाऱ्या कोल्हापूर मध्ये मूकपट काळातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले भालजी पेंढारकर यांनी अभिनयापासून कारकीर्दीस सुरुवात केली..यात १९२४ मध्ये निर्मित 'पृथ्वीवल्लभ' हा महत्वपूर्ण चित्रपट होता! यानंतर लेखन आणि दिग्दर्शनात त्यांनी पाऊल टाकले..यात मुख्यत्वे पौराणिक व ऐतिहासिक चित्रपट करण्याकडे त्यांचा कल होता. यातही 'बाजीराव मस्तानी' (१९२५) सारखी इतिहासातील (आजही भुरळ पडणारी) प्रेमकथा त्यांनी पडद्यावर आणली..आणि त्या स्वातंत्र्यपूर्व काळात 'वंदे मातरम' (१९२७) सारखा देशाभिमानी चित्रपटही तयार केला!
भालजी पेंढारकर निर्मित 'छत्रपती शिवाजी' (१९५२) ह्या चित्रपटात लीलाबाई व चंद्रकांत!

भालजी पेंढारकरांच्या 'साधी माणसं' (१९६५) या सामाजिक चित्रपटात सूर्यकांत आणि जयश्री गडकर!
१९३२ साली भालजी पेंढारकरांनी लिहून दिग्दर्शित केलेला 'श्यामसुंदर' हा त्यांचा पहिला भरगोस यश संपादलेला चित्रपट..यात शाहू मोडक आणि शांता आपटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यानंतर 'नेताजी पालकर' (१९३९) व 'थोरातांची कमळा' (१९४१) अशा शिवकालातील रोमहर्षक कथांवर ते चित्रपट करू लागले. त्याच सुमारास 'महारथी कर्ण' (१९४४) हा पुराणातील युगपुरुषावरचा चित्रपट त्यांनी निर्माण केला आणि असे चित्रपट ते हिंदीतूनही करू लागले..ज्यांत पृथ्वीराज कपूर यांनी भूमिका केल्या. तर वाल्मिकी' (१९४६) या त्यांच्या चित्रपटाद्वारे नारदाच्या भूमिकेत राज कपूर पडद्यावर आला!

पुढे भालजी पेंढारकरांचा 'छत्रपती शिवाजी' (१९५२) हा चित्रपट आला..यात चंद्रकांत मांढरे यांनी अतिशय रुबाबात महाराजांची भूमिका साकारली, जी तमाम मऱ्हाटी जणांस भावली! नंतर शिवरायांच्या वीरश्री पूर्ण कथा बाबा खास त्याच्या शैलीत पडद्यावर मांडू लागले; अन आदर्श बोधपटांची जणू मालिकाच सुरु झाली..त्यांत मग 'मराठा तितुका मेळवावा' (१९६४) चित्रपटाने कळस गाठला. यातील शेवटचे "स्वराज्य तोरण चढे...मराठी पाऊल पडते पुढे.." हे महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगीचे चित्रगीत आजही स्फूर्तिदायी ठरते!
भालजी पेंढारकरांच्या (अनुपमा अभिनीत) 'तांबडी माती' (१९६९) चित्रपटाचे पोस्टर!

याच दरम्यान भालजी पेंढारकरांनी सामाजिक चित्रपटही केले..ज्यांत 'साधी माणसं' (१९६५) हा चित्रपट फार मोलाचा ठरला. भ्रष्ट समाज व्यवस्थेत भरडल्या जाणाऱ्या भाबड्या खेडुतांचे वास्तव त्यांनी यात दर्शवले. यात सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी त्या भूमिका जणू जगल्या! यास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! त्यानंतर 'तांबडी माती' (१९६९) हा कोल्हापुरातील अस्सल मातीतला चित्रपट करून त्यात दडलेलं हळवं भावविश्व पडद्यावर रंगवले. यात अनुपमा या रूपगुणसंपन्न अभिनेत्रीने लाजवाब काम केले! बाबांनी तसे अनेक अभिनेते (मांढरे बंधुंसारखे), अभिनेत्री (सुलोचनाबाईंसारख्या) व तंत्रज्ञ चित्रपटसृष्टीत पुढे आणले! त्यांच्या पत्नि लीलाबाई सुद्धा चित्रपटात अभिनय व गायन करीत..'सैरंध्री' (१९३३) या पहिल्या भारतीय रंगीत चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केली होती!
भालजी पेंढारकर यांस गुरु मानणाऱ्या दादा कोंड़केंची भूमिका असलेला बाबांचा 'गनिमी कावा' (१९८१). 


भालजी पेंढारकर यांचा व त्यांच्या चित्रपटांचा महाराष्ट्रात व राष्टीय स्तरावर गौरव होत गेला. त्याच बरोबर त्यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' बहाल करण्यात आला!

भालजी बाबांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी त्यांवर केलेला वृत्तपट!
भालजी पेंढारकर यांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनीही दिग्दर्शन व लेखन क्षेत्रांत नाव कमावले. बाबांच्या निर्मितीतील 'शाब्बास सुनबाई' (१९८९) चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले..ज्यातून अश्विनी भावे पडद्यावर आली! 'फिल्म डिव्हिजन' द्वारे त्यांनी विविध वृत्तपट व माहितीपट तयार केले!

माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकातून त्यांनी अशा विषयांवर लेखन केले आणि माझ्या चित्रपट पत्रकारितेतील समर्पित कार्याबाबत ते कौतुकोद्गार काढीत!


मागे मी 'मराठी चित्रपट महामंडळा'च्या पुरस्कार सोहळ्या निमित्त कोल्हापूरला गेलो असताना आवर्जून 'जयप्रभा स्टुडिओ'त जाऊन आलो आणि भालजी पेंढारकर यांच्या अनेक चित्रपटांच्या निर्मितीच्या पाऊलखुणा न्याहाळून आलो! एक जिव्हाळा आणि आपुलकीचे चित्रपटीय वातावरण तिथे प्रत्ययास आले..आणि हेलावून गेलो!


बाबांस आणि त्यांच्या थोर कार्यास हा कुर्निसात!!


- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment