Tuesday 3 April 2018

मराठी व्यावसायिक चित्रपट पुन्हा रांगड्या भाबड्या प्रेमाकडे!

- मनोज कुलकर्णी 


रांगड्या प्रेमाच्या 'सैराट' मध्ये आकाश ठोसर व रिंकू राजगुरू!


सूर्यकांत व जयश्री गडकर..'साधी माणसं' मधील भाबडं प्रेम!

'सैराट' काय तूफान हिट झाला आणि मराठी व्यावसायिक चित्रपट पुन्हा ग्रामीण रांगड्या प्रेमाकडे वळला! अलीकडे आलेले 'बबन' अन 'गावठी' सारख्या चित्रपटांची झलक पाहता हे जाणवते!
खुळ्यासारखा दादा कोंडके यांचा इरसाल 'सोंगाडया'!

पूर्वी सूर्यकांत व जयश्री गडकरांचे कोल्हापुरात होणारे (भालजींचे वा अनंत मानेंचे) ग्रामीण चित्रपट काहीसे भाबडे प्रेम सादर करीत..म्हणजे नायक जर रंगात आला तर नायिका लटक्या फणकाऱ्याने म्हणे "जावा तिकडं" तर नायक तोंड एवढंसं करून म्हणे "हाय का आता..आमी काय केलं!" बाहेर मिशीला पिळ देऊन रुबाब मारणारे असे रांगड़े नायक प्रेम व्यक्त करण्यात मात्र निष्प्रभ ठरत!
'सुधारलेल्या बायका' मध्ये राजा गोसावींचं दिखाऊ भोळेपण!


यांमध्ये दादा कोंडके यांनी (उगाच खुळ्यासारखं वागणारा) भोळाभाबडा नायक आणला; पण तो ते सोंग घेतलेला 'सोंगाडया' होता! त्यांच्या द्वयर्थी संवादांनी कुठे कुठे तीर मारले हे मुरलेल्या प्रेमवीरांनाही अचंबित करून गेले!
रमेश देव व सीमा यांचं खरंखुरं प्रेम.."सांग कधी कळणार तुला.."

मग जरा (तत्कालिन) पुण्याकडे हा चित्रपट हलला की राजा गोसावी सारखे भोळसट नायक कामिनी नामक नायिकेला "असं काय बरं कम्या..बघ की इकडं" अस आळवीत! 
"प्रथम तुज पाहता.."_'मुंबईचा जावई' मध्ये अरुण सरनाईक यांचं व्यक्त होणं!


पुढे विवेक, रमेश देव सारख्यांनी "सांग कधी कळणार तुला.." अशा प्रेमगीतांद्वारे हे कसब साधलं! दरम्यान अरुण सरनाईक यांनी एकीकडे ग्रामीण बाजात "एक लाजरा न साजरा मुखड़ा.." अशा गीतांतून तर दुसरीकडे शहरी ऐटीत "धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना.." सारख्या गीतामध्ये मोहक सुंदर अनुपमा बरोबर प्रेमाला 'शब्दरूप' दिले!
'बबन' नामक त्या धर्तीचा अलीकडचा चित्रपट!




पुढे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एकसुरी बोलण्यांत तसा प्रेमाविष्कार कठीणच होता; मात्र हिंदी चित्रपटातून मराठी चित्रपटाकडे आलेल्या सचिन व महेश कोठारे यांनी त्या स्टाईल मध्ये 'प्यार किया'!

अर्थात मराठी चित्रपटांतील प्रेमाविष्कारांचा हा धावता पट जसा डोळ्यांसमोर आला तसा इथे मांडला..आणि जाणवले की मराठी चित्रपट पुन्हा गावाकडे आणि रांगड्या प्रेमाकडे वळतोय! 

पण हे केवळ धंदेवाईक दृष्टीकोनातून नसावे, तर (आचरटपणा टाळून) सामाजिक आशयही त्यांत असावा!


- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment