Tuesday 24 April 2018

विशेष मानवंदना लेख!


राजाभाऊ परांजपे...मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचे चित्रकर्ते!


 - मनोज कुलकर्णी 


राजाभाऊ परांजपे..मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील चित्रकर्ते!


'पेडगावचे शहाणे' (१९५२) मध्ये राजाभाऊ परांजपे!

"झांजीबार झांजीबार झांजीबार.."

वेड्यांच्या इस्पितळात नीयतीच्या क्रूर खेळामुळे वेडे झालेल्यांबरोबर तसेच सोंग घेऊन नाचताना 'पेडगावचे शहाणे'..म्हणजे राजाभाऊ परांजपे यांनी (विक्षिप्त) झोकात सादर केलेले हे गाणे नि त्यांवरील तो (भकास) नाच! १९५२ सालचा हा चित्रपट दूरदर्शन वर पाहताना चर्र झालं होतं!

त्यानंतर बऱ्याच वर्षांनी फिल्म फेस्टिवल मध्ये 'सर्कस पॅलेस्टाईन' (१९९८) ह्या इस्राईलच्या चित्रपटातील एक दृश्य पाहून त्याची आठवण झाली..यांत बरा होऊन बाहेर आलेला तरुण आपली प्रेयसी दुसऱ्याबरोबर पाहून (शहाण्यांच्या जगात पुन्हा वेडे होण्यापेक्षा वेड्यांच्या दुनियेत शहाणे राहू अशा विचाराने) अस्वस्थ होऊन माघारी फिरतो!
'ऊन पाऊस' (१९५४) या श्रेष्ठ करुण चित्रकृतीमध्ये सुमति गुप्ते व राजाभाऊ परांजपे!


जीवनाचे असे अनोखे रंग राजाभाऊ परांजपे यांनी आपल्या अभिजात मराठी चित्रकृतीं मधून दर्शवले. त्यांचा अभिनय नि दिग्दर्शन थेट काळजाला भिड़े!..त्यांचा आज जन्मदिन!

मिरजेला १९१० साली जन्मलेले राजा परांजपे मूकपटांचा काळातच चित्रपटाकडे ओढले गेले..तेंव्हा पडद्यासमोर वाद्ये वाजवणाऱ्यांत ते प्रथम सामील झाले! त्यानंतर नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी सुचविल्यामुळे 'नाट्यमन्वंतर' संस्थेत त्यांना ऑर्गन वादकाचे काम मिळाले..आणि मग 'गोदावरी सिनेटोन' मध्ये संगीतकार बापूराव केतकर यांचे ते सहाय्यक झाले!


'हा माझा मार्ग एकला' (१९६३) मध्ये राजाभाऊ परांजपे व बाल सचिन!
त्यानंतर १९३६ साली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेल्या (आद्य सामाजिक समस्याप्रधान) 'सावकारी पाश' चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. नंतर कोल्हापुरात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रुजू झाले! बाबांच्या 'कान्होपात्रा' (१९३७) सारख्या काही चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका रंगवल्या!

मग १९४८ मध्ये विष्णुपंत चव्हाण आणि वामनराव कुलकर्णी यांची निर्मिती असलेल्या 'जीवाचा सखा' या चित्रपटाने राजाभाऊ परांजपे यांना दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली. इथेच त्यांना भेटले पटकथाकार ग. दि. माडगूळकर व संगीतकार सुधीर फडके..आणि या त्रयीने पुढे मराठी चित्रमाणके घडवली!
बिमल रॉय यांच्या 'बंदिनी' (१९६३) या हिंदी चित्रपटात राजाभाऊ परांजपे, अशोक कुमार व नूतन!

आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत राजाभाऊंनी विविध प्रकारचे चित्रपट हाताळले..यात 'पुढच पाऊल' (१९५०) सारखा प्रागतिक सामाजिक, 'लाखाची गोष्ट' (१९५२) सारखा उपहासगर्भ आणि 'पडछाया' (१९६५) सारखा थरारपटही होता! यांत रमेश देव-सीमा यांची पडद्यावर यशस्वी कारकीर्द सुरु करणारा कौटुंबिक 'सुवासिनी' (१९६१)..आणि बाल सचिन ची चित्रपट कारकीर्द सुरु करणारा 'हा माझा मार्ग एकला' (१९६३) ह्यांसाठी त्यांना 'उत्कृष्ठ दिग्दर्शका'ची पारितोषिके मिळाली!
मधुकर पाठक यांच्या 'संथ वाहते कृष्णामाई' (१९६७) मध्ये राजाभाऊ परांजपे!


राजाभाऊंनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून आपल्या समर्थ अभिनयाचे दर्शन घडवले! यांत त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या 'जगाच्या पाठीवर' (१९६०) सारख्या चित्रकृति; तर अन्य..म्हणजे बिमल रॉय सारख्या श्रेष्ठ बंगाली दिग्दर्शकाचा 'बंदिनी' (१९६३) आणि स्वतःचे आधी सहायक असलेले मधुकर तथा बाबा पाठक यांनी स्वतंत्र दिग्दर्शित केलेला 'संथ वाहते कृष्णामाई' (१९६७) यांचा समावेश होतो!

प्रामुख्याने उल्लेख करायचा तो त्यांनी दिग्दर्शित करुन अभिनय केलेल्या 'ऊन पाऊस' (१९५४) या श्रेष्ठ करुण चित्रकृतीचा..मुलांनी वाटून घेऊन ताटातूट केलेल्या वृद्ध जोडप्याची व्यथा त्यांनी सुमति गुप्ते यांसह काळीज पिळवटून टाकणाऱ्या आविर्भावांत यातून व्यक्त केली! यापासून स्फूर्ती घेऊन रवि चोप्रा यांनी 'बाग़बान' (२००३) हा हिंदी चित्रपट बनविला होता..त्यांत अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांनी मूळ (राजाभाऊ-सुमतीबाई यांनी हृदयद्रावक साकारलेला) टेलिफोन वर बोलण्याचा प्रसंग ही सादर केला!..तर राजाभाऊंच्या रहस्यप्रधान 'पाठलाग' (१९६४) वरुन राज खोसला यांनी (सुनील दत्त व साधना यांची भूमिका असलेला) 'मेरा साया' (१९६६) हा हिंदी चित्रपट केला होता!
"एक धागा सुखाचा.."..'जगाच्या पाठीवर' (१९६०) 
मध्ये सादर करताना राजाभाऊ परांजपे!


तीन निर्मिंतींसह सुमारे ३२ चित्रपट राजाभाऊ परांजपे यांनी दिग्दर्शित केले आणि १९६९ सालचा 'आधार' यांत शेवटचा होता!..मात्र १९७४ सालच्या 'उस पार' पर्यंत सुमारे ८० चित्रपटांतून ते पडद्यावर अभिनेते म्हणून आले..आणि १९७९ साली हे जग सोडून गेले..माडगूळकरांच्या शब्दांत जीवनाचे सार मांडून..

"एक धागा सुखाचा..शंभर धागे दुःखाचे..
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे!"

त्यांना माझी विनम्र भावांजली!!

- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment