Wednesday 11 April 2018

श्रीमती सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर बरोबर मी.. 
'एन.एफ.ए.आय.' मध्ये 'कासव' चित्रपट पाहताना!

आम्ही चित्रपट प्रवासी!


 - मनोज कुलकर्णी



१९८३ चा माझा महाविद्यालयीन काळ..चित्रपट विषयक लिखाणास मी सुरुवात केली होती! त्याच सुमारास पुण्यामध्ये 'चित्रदर्शन' या संस्थेचे चित्रपट रसग्रहणाचे कार्यक्रम सुमित्रा भावे आणि त्यांच्या सहकारी करू लागले..आणि मी त्याचा सदस्य झालो! 'टिळक स्मारक मंदिर' च्या बेसमेंट मधे याचे वर्ग होत..अध्यापनासाठी प्रा. श्यामला वनारसे व 'फिल्म इंस्टिट्यूट' चे प्रा. सतीश बहादुर येत..मग सत्यजित राय यांच्या विख्यात 'पाथेर पांचाली' पासून ते तत्कालिन पूर्व यूरोपियन चित्रपटांपर्यंत अनेक चित्रकृतिंवर त्यांतील दृश्ये पाहून अभ्यासपूर्ण चर्चा होई! त्यावेळी माझ्याबरोबर समवयस्क सहभागी होते..अभिराम भडकमकर आणि सुनिल सुकथनकर!
'फिल्म इंस्टिट्यूट' मध्ये मी 'फिल्म अप्रिसिएशन कोर्स' चे सर्टिफिकेट
विख्यात मल्याळी चित्रकर्ते अडूर गोपालकृष्णन यांच्याकडून घेताना! 
(मध्यभागी प्रा सतीश बहादूर!)

नंतर 'कम्युनिकेशन एंड जर्नालिज़्म' च्या पदवी शिक्षणासाठी मी १९८७ मध्ये 'पुणे विद्यापीठा'च्या 'रानडे इंस्टिट्यूट' ला गेलो, अभिराम नाट्यविषयक पदविका अभ्यासक्रमासाठी 'नॅशनल स्कूल ऑफ़ ड्रामा' ला गेला आणि सुनिल चित्रपट दिग्दर्शन अभ्यासक्रमासाठी 'फिल्म इंस्टिट्यूट' ला! याच काळात मी आमच्या 'जर्नालिज़्म डिपार्टमेंट' मधे 'फिल्म क्लब' पाहू लागलो..आणि ग्रिफिथ (अमेरिका-'बर्थ ऑफ़ ए नेशन'), आइसेंस्टिन (सोविएट/रशिया-'बैटलशिप पोटेमकिन'), डी सिका (इटली-'बाइसिकल थीव्ज़'), गोदार्द (फ्रांस-'ब्रेथलेस'), बर्गमन (स्वीडन-'वर्जिन स्प्रिंग'), कुरोसवा (जपान-'राशोमोन') सारख्या जगविख्यात दिग्दर्शकांचे महत्वाचे चित्रपट त्यात दाखवले. दरम्यान सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी संयुक्त चित्रपट करणे सुरु केले होते. त्यातील 'पाणी' व 'बाई' हे लघुपट घेऊन ते तिथे आले होते!
'दोघी' (१९९६) या चित्रपटात सोनाली कुलकर्णी व रेणुका दफ्तरदार!

'बी. सी.जे.' नंतर १९८९ मध्ये मी 'फिल्म इंस्टिट्यूट' मध्ये सतीश बहादुर व 'नॅशनल फिल्म र्काइव्ह' चे संस्थापक-संचालक पी. के. नायर यांच्या प्रोत्साहनाने 'फिल्म अप्रिसिएशन कोर्स' केला आणि प्रोफेशनल फिल्म क्रिटिक म्हणून बऱ्याच ठिकाणी लिखाण करू लागलो. १९९५ पासून 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'स ('इफ्फी') जाऊ लागलो. त्यामुळे जागतिक चित्रपटावरील लिखाणात अद्ययावतता येत राहिली.
'बाधा' (२००६) या चित्रपटात अमृता सुभाष!

मग १९९६ मध्ये दिल्लीत झालेल्या 'इफ्फी' मध्ये आपला 'दोघी' हा चित्रपट घेऊन सुमित्रा भावे आणि सुनिल हे..कलाकार सोनाली कुलकर्णी व रेणुका दफ्तरदार सह आले होते..त्यावेळी वार्तालाप मध्ये मी त्यांचा घेतलेला फोटो अजुन माझ्याकडे आहे..नंतर पुण्यात त्यांच्या मुलाखतीही घेतल्या! दरम्यान अभिराम भडकमकरने अभिनयाबरोबर नाटक व मराठी चित्रपट लिहिणे सुरु केले होते!

मी पण प्रिंट बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियासाठीही लेखन सुरु केले..माझ्या स्क्रिप्ट्स वर 'झी' (हिंदी) व 'सह्याद्री' (मराठी) वर चित्रपट विषयक कार्यक्रम झाले!

इफ्फी' प्रमाणेच 'मामी', 'मिफ्फ', 'एशियन' अशा वेगवेगळे फिल्म फेस्टिवल्सना मी जाऊ लागलो आणि भावे-सुकथनकर यांचे चित्रपटही त्यांत येत गेले..पुरस्कार व राज्य पारितोषिकेही मिळवीत गेले! 'दोघी' ने ज्वलंत वास्तव पडद्यावर आणण्याची त्यांची दिसलेली सामाजिक बांधिलकी पुढेही कायम राहिल्याचा प्रत्यय त्यांच्या चित्रपटांतून येत गेला! 'एड्स' सारख्या समाजाला पोखरणाऱ्या विषयावरही २००० साली त्यांनी 'जिंदगी ज़िंदाबाद' नावाचा हिंदी चित्रपट करून अतिशय संवेदनशील भाष्य केले! मग 'वास्तुपुरुष' (२००२) व 'बाधा' (२००६) या पुन्हा मराठी चित्रपटांतून रूढ़ी, परंपरा नि अंधश्रद्धा यांवर त्यांनी प्रकाश टाकला! दरम्यान अभिराम भडकमकरने 'आम्ही असू लाड़के' चित्रपट करून लेखनाबरोबरच दिग्दर्शनात पाऊल टाकले!
माझ्या 'चित्रसृष्टी' नियतकालिकाच्या प्रकाशन समारंभात (डावीकडून) मी आणि.. 
(सर्वश्री) सतीश बहादूर, पी. के. नायर, राम गबाले, शशीधरन व जब्बार पटेल!


२००२ साली माझे 'चित्रसृष्टी' हे जागतिक चित्रपटावर इतिहास, सद्यस्थिती नि विकास या दृष्टिकोनातून प्रकाशझोत टाकणारे नियतकालिक सुरु झाले..त्यामध्ये चित्रपट महोत्सवांवरील लेखांमधून भावे-सुकथनकर यांच्या चित्रपटांवरही भाष्य असू लागले!

'संहिता' (२०१३) चित्रपटात देविका दफ्तरदार, राजेश्वरी सचदेव व मिलिंद सोमण!


२००६ मध्ये 'नितळ' चित्रपटातून कोड हा व्यक्तिमत्वावर डाग नसल्याचे भावे-सुकथनकर यांनी मानवतावादाच्या दृष्टिकोनातून मांडले..देविका दफ्तरदारने ही व्यक्तिरेखा समंजसपणे सुरेख साकारली होती. दरम्यान मुलांसंदर्भातील शिक्षणाच्या दृष्टिकोनावर भाष्य करणारा 'दहावी फ' ही त्यांनी पास केला! पुढे 'एक कप च्या' (२००९) मधून भ्रष्ट व्यवस्थेवर प्रकाश टाकला! याच सुमारास त्यांनी 'घो मला असला हवा' हा कोकणी भाषेचा लहेजा असलेला लोकप्रिय जॉनरचा, पण उपहासगर्भ चित्रपट निर्माण केला..यात राधिका आपटेने भन्नाट भूमिका रंगवली..महोत्सवातही प्रेक्षकांनी यास तूफान दाद दिली!
'कासव' (२०१७) चित्रपटात अलोक राजवाडे व इरावती हर्षे!

आता 'कासव' हा नैराश्येच्या गर्तेत असलेल्या मनाचा वेध घेणारा सर्वोच्च पारितोषिक विजेता चित्रपट करणाऱ्या सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर यांनी २००४ मध्ये 'देवराई' हा स्किजोफ्रेनिया या मानसिक आजारावरचा चित्रपट दिग्दर्शित केला होता..आणि अतुल कुलकर्णीने ही भूमिका जणू जगली होती! पुढे २०१३ ला आलेला त्यांचा 'अस्तु' सुद्धा असा मनोविकारावरच बेतला होता..ज्यात मोहन आगाशे यांनी अशी व्यक्तिरेखा साकारली होती आणि अमृता सुभाषला यातील सह्रदय भाबड्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला!


याच दरम्यान त्यांनी केलेला चित्रपट 'संहिता' हा एक प्रयोग होता..जो मागे वेगळ्या स्वरुपात युरोपियन चित्रपटांत दिसला होता; पण इथे पटकथा नि व्यक्तिरेखांची गुंफण वेधक साधली गेली नि त्यास संगीताची सुरेल साथ होती..यातील "पलके ना मून्दो.." गाण्यासाठी आरती अंकलीकर यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला! यात देविका दफ्तरदार व मिलिंद सोमण बरोबर राजेश्वरी सचदेवची व्यक्तिरेखा सुंदर होती!
'इफ्फि', गोवा मध्ये मी, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे व अभिराम भडकमकर!


'चाकोरी' पासून सुमारे ४० लघुपट, टेलीफिल्म्स आणि १४ चित्रपट मराठी व 'बेवक़्त बारिश' सारखे हिंदीही भावे-सुकथनकर यांनी आजवर केलेत. दरम्यान त्यांच्याकडे उमेदवारी केलेली मुलं आता चित्रपट करू लागलेत!

आता 'कासव' ने मिळवलेला 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटा' चा पुरस्कार हे एक रुपकच म्हणावे लागेल त्यांच्या चित्रपट प्रवासाचे!..त्यांचे अभिनंदन!!

तर असे हे आठवणींच्या हिंदोळ्यावर...आम्ही चित्रपट प्रवासी!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment