Tuesday 26 March 2024

सृष्टी नि मानव!


सूर्य म्हणेल माझा धर्म...
विश्वाला प्रकाशमय करणे!
चंद्र म्हणेल माझा धर्म...
रमणीय शीतलता देणे!
हवा म्हणेल माझा धर्म...
जगणाऱ्यांस प्राणवायू देणे!
जल म्हणेल माझा धर्म...
प्राणिमात्रांची तहान भागवणे!
झाड म्हणेल माझा धर्म..
फुल, फळ, सावली देणे!
मानव इथे काय म्हणेल...?
उमगले की सांगेन म्हणतो!

- मनोज 'मानस रूमानी'

'बुद्धिप्रामाण्यवाद'चा अर्थ नि महत्व जाणण्याची गरज!

- मनोज कुलकर्णी

Monday 25 March 2024

अनिष्ट गोष्टी, प्रवृत्तींची होळी फक्त म्हणायचं
नैतिकता, तत्वे, स्वाभिमान हेच जणू जळतंय!

- मनोज 'मानस रुमानी'

Friday 8 March 2024


अबोली आता बोलू लागली
फुलून आसमंत पाहू लागली
पानापानांतून जणू व्यक्त होत
सुगंध आपलाही दरवळू लागली!

- मनोज 'मानस रुमानी'

('महिला दिन' निमित्त रूपक!)

Thursday 24 August 2023


"भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी..."


हे तितक्याच भावोत्कटपणे पडद्यावर साकार करणाऱ्या, अभिजात मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखदायीच!


रमेश देव-सीमा देव या दिग्गज कलाकार दांपत्याशी झालेली भेट आज आठवते!!

त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 6 August 2023

निसर्गकवी ना. धो. महानोर.
"गडद जांभळं भरलं आभाळ..."

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचे निधन झाल्यावर त्यांचे हे काव्य त्यांच्याच आवाजात मनात रुंजी घालू लागले..आणि मन सुन्न झाले!


'रानातल्या कविता', 'गावातल्या गोष्टी', 'पक्ष्यांचे लक्ष थवे' असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.

"चिंब पावसानं रान झालं आबादानी.." सारखी त्यांची चित्रपटगीतेही तो मराठी मातीचा गंध घेऊन आली!

विशेषत्वानं आठवतं ते जब्बार पटेल यांच्या 'जैत रे जैत' (१९७७) चित्रपटात स्मिता पाटीलने अप्रतिम साकार केलेलं..
 "नभ उतरू आलं..चिंब थरथर वल्ल
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात!'


'अजिंठा' या त्यांच्या खंड्काव्यावर प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी चित्रपटही केला!..तेही नुकतेच हे जग सोडून गेले!

'साहित्य अकादमी' ते 'पद्मश्री' असे मानाचे पुरस्कार महानोर यांना लाभले! 'मराठी साहित्य संमेलना'चे ते अध्यक्षही झाले!

त्यांच्या काव्यवाचनाच्या वेळी त्यांची झालेली भेट आठवते!!

त्यांना भावपूर्ण पुष्पांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 2 August 2023

सोयीचे बचावात्मक राजकारण करीत दोन्हीकडे असणारे पाहून 'असून अडचण, नसून खोळंबा!' म्हणीची आठवण झाली!

- मनोज कुलकर्णी

Thursday 6 July 2023

'नाथ हा माझा' नाटकाचा खेळ होऊन गेला..
आता 'दादा कमळ बघ' पाठ गिरवला गेला..
राज्य-कारणाच्या अशा नाना तऱ्हा दिसल्या!

- मनोज 'मानस रूमानी'

(राज्यातील सद्यस्थितीवर!)

राजकीय भूकंप, बंड? का..
कथित राजकीय चाणक्यांची खेळी?

(राज्यातील सद्यस्थितीवर!)

Friday 9 June 2023

संगीत आणि अभिनय क्षेत्रांतील आदरणीय..लता मंगेशकर आणि सुलोचनाबाई!


"गडनी, सजनी..
गडनी सजनी गं.."

भालजी पेंढारकरांच्या 'साधी माणसं' (१९६५) मधील हे नणंद-भावजय यांच्या ऋणानुबंधांचं गाणं!..या ग्रामीण चित्रपटांत जयश्री गडकर यांच्याबरोबर ही "मायेची वयनी" साकार केली होती..अर्थात सुलोचनाबाईंनी!
भालजींचेच ('योगेश' नावाने) हे गीत लता मंगेशकर यांनी स्वतःच्याच ('आनंदघन') संगीतांत भावोत्कटतेनं गायलेय!

 

सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी, चित्रपटसृष्टीत एकाच ठिकाणी लता दीदीं पाठोपाठच कारकीर्द सुरु झालेल्या सुलोचना दीदी यांचे त्यांच्याशी स्नेहबंध जुळले ते कायमचेच! आता हा दैवयोग म्हणावा की काय, मागच्या वर्षी लताजी हे जग सोडून गेल्या आणि पाठोपाठ या वर्षी सुलोचनाजी ही गेल्या!

संगीत आणि अभिनय क्षेत्रांतील आपल्या ह्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांचे असे आपल्याला सोडून जाणे हे काहीसे वरील गीतातील "आसवांची गंगा वाहते.." शब्दांप्रमाणेच भावुक करणारे!

माझे भाग्य की मला वंदनीय असणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे (माझ्या 'चित्रसृष्टी' संदर्भात) मला जिव्हाळापूर्ण कौतुक लाभले!!

त्यांना माझी नम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी


मनस्वी जिव्हाळा असलेल्या ह्या वात्सल्यमूर्ती आता आपल्यात नाहीत याने मन अतिशय दुःखी झालेय! 😢

आदरणीय दिग्गज अभिनेत्री.. सुलोचनाबाई यांस विनम्र श्रद्धांजली!! 🥀🙏

- मनोज कुलकर्णी

Sunday 14 May 2023

"देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे..
जीवन देई मम बाळाला.!"


मातेचे असे उत्कट भाव पडद्यावर व्यक्त झाले होते वात्सल्यमूर्ती सुलोचनाबाई यांच्या रूपात!

भावकवी पी. सावळाराम यांचे हे हृदयस्पर्शी गीत वसंत देसाई यांच्या संगीतात गायले होते आशा भोसलेंनी!

साने गुरुजी यांच्या हळव्या लेखणीतून आलेल्या कथेवरील हा चित्रपट होता यशवंत पेठकर यांचा 'मोलकरीण' (१९६३). साठ वर्षें होऊन गेली यास...पण मराठी रुपेरी पडद्यावरील मातृवात्सल्य आठवताना हेच भावुक गीतदृश्य समोर येते!

फार पूर्वी रेडिओवर माझ्या संहितेवर मी सादर केलेल्या मातृविषयक कार्यक्रमात हे गाणे प्रथम होते!
कालांतराने माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकासाठी आदरणीय सुलोचनाबाईची मी घेतलेली मुलाखत अविस्मरणीयच!!


या मातृदिनी शुभेच्छा!!!

- मनोज कुलकर्णी

Friday 12 May 2023

मराठी चित्रपटवाल्यांनी आता चालू राजकीय (नाट्य) व सामाजिक घडामोडींवर चित्रपट काढावेत!
पण बहुतांश इतिहासातून बाहेर येत नाहीत, तर समकालीन चित्रपटीय भाष्य कसे होणार?

- मनोज कुलकर्णी